अलिबागच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवासेनेचे जोरदार आंदोलन; महेश मोहिते यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेधाच्या घोषणा
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्याबाबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवासेनेने शुक्रवारी अलिबागमध्ये आक्रमक आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात युवासेनेच्या पदाधिकारी व युवा सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मोहिते यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला.
आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या युवा सैनिकांनी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महेश मोहिते यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. राजकीय नेत्यांविरोधात करण्यात येणाऱ्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापत असताना युवासेनेने या आंदोलनातून आमदार दळवी यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनादरम्यान भाजप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते यांच्या वक्तव्यावरून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे आणि प्रवक्ते धनंजय देशमुख यांचाही आंदोलनकर्त्यांकडून निषेध करण्यात आला.
अलिबागच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत केलेल्या या आंदोलनातून आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या घडामोडींमुळे रायगड जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
तसेच युवासेना रायगड जिल्हाध्यक्ष हर्षल घरत, युवासेना रायगड जिल्हा सचिव निखिल तावडे, युवासेना अलिबाग शहराध्यक्ष यश पालवणकर,शिवसेना अलिबाग शहरप्रमुख विकास कर्णेकर, युवासेना अलिबाग तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील, शिवसेना तथा युवासेना अलिबाग शहर आणि अलिबाग तालुका कार्यकर्ते उपस्थित होते







