भगवान बिरसा मुंडा जयंती सप्ताहानिमित्त चोंढी आदिवासीवाडीत वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रम


प्रिझम सामाजिक विकास संस्था, मेरा युवा भारत आणि स्पर्धा विश्व अकॅडमीचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

अलिबाग (प्रतिनिधी) : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या जनजाती गौरव दिवसाचे औचित्य साधून चोंढी आदिवासीवाडी येथे वृक्षारोपण व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार, रायगड-अलिबाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच स्पर्धा विश्व अकॅडमी, अलिबाग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जिल्हा युवा समन्वयक साक्षी गुप्ता यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चोंढी आदिवासीवाडी येथील गणेश मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ॲड. निहा राऊत, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी प्रतिनिधी राज म्हात्रे, मंगला पवार आणि अंगणवाडी सेविका राजश्री नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ॲड. निहा राऊत यांनी विद्यार्थ्यांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याची, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची तसेच त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून विविध गाणी सादर करून घेण्यात आली. तपस्वी गोंधळी यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याचा, शिक्षणाला प्राधान्य देण्याचा आणि जीवनात ध्येय निश्चित करून पुढे जाण्याचा सल्ला दिला.

यानंतर कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांच्या हस्ते गणेश मंदिरासमोरील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक जागृती, शिक्षण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

सामाजिक बांधिलकी जपत आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणारा आणि पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.