रायगड जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ 182 अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी किट मंजूर


अलिबाग (प्रतिनिधी): विद्याथ्र्यांच्या शिक्षणाचा पाया हा अंगणवाडीमध्ये रचला जातो. हा पाया मजबूत करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्राचा दर्जा सुधारून पायाभूत सोयी सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या अंगणवाड्यांचे आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्याकरिता शासनाकडून ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ देण्यात येणार आहे. या योजजनेंतर्गत रायगड जिल्हयातील 182 अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी किट प्राप्त होणार आहेत.
अंगणवाडी केंद्रांमधून 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती महिला, स्तनदा मातांना पोषण, आरोग्याशी संबंधित सेवा दिल्या जातात. आदर्श अंगणवाडी केंद्र तयार करून त्यात आधुनिक सुविधा देत बालकांना आनंददायी, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अंगणवाड्यांमधील शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. या योजजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील 182 अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी किट प्राप्त होणार आहेत.

*********
स्मार्ट अंगणवाडी किटमध्ये ‘या’ साहित्याचा समावेश:
स्मार्ट अंगणवाडी किटमध्ये विविध आधुनिक सुविधा आणि साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ई-लर्निंगसाठी आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिन सुविधा, अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी, इमारतीची आवश्यक किरकोळ दुरुस्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण याबाबींचा समावेश आहे.

*********
रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणेकरिता 182 अंगणवाडी केंद्राना “स्मार्ट अंगणवाडी किट” चा पुरवठा करण्यात येणार आहे. सदर योजनेमुळे अंगणवाडीतील बालकांच्या गुणवत्ता वाढीस हातभार लागणार आहे.
– रसिका केणी, महिला व बालकल्याण सभापती, राजिप