पेण (प्रतिनिधी) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण-रायगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ बुधवारी (दि. १५ एप्रिल) सकाळी ११ वाजता उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे, अपघातांची संख्या कमी करणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची सवय नागरिकांमध्ये रुजवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. ‘स्वयंशिस्त हाच रस्ता सुरक्षेचा सर्वोत्तम उपाय’ हा संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप विभागीय अधिकारी श्री. प्रवीण पवार हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस उप अधीक्षक श्री. जालिंदर नालकूल उपस्थित होते. तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. माधव सूर्यवंशी व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विष्णू घोडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
अभियानादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि क्विझ स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यंदाच्या अभियानाचे प्रमुख आकर्षण ठरलेली ‘रस्ता सुरक्षा’ विषयावरची रील स्पर्धा देखील मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये पारितोषिक देण्यात आले.
याशिवाय रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रिक्षाचालक, मिनिडोर चालक तसेच स्कूल बस चालक यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेण्यात आली. सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसाठी त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. या अभियानामुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






