रायगड (प्रतिनिधी): आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी कार्यालयात जाण्यासाठी सायकलचा वापर सुरू केला आहे.
गुरुवारी त्या रामनाथ येथील शासकीय निवासस्थानापासून थेट सायकलवरून पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्या. त्यांचा हा साधा पण प्रभावी उपक्रम पाहून अधिकारी व कर्मचारीही प्रेरित झाले आहेत. अधिकृत दौरे वगळता दैनंदिन कामासाठी सायकल वापरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
“इंधन बचतीची सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी. छोट्या अंतरासाठी सायकल हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे इंधन बचतीसोबत आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणालाही मदत होते,” असे आँचल दलाल यांनी सांगितले.
त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून पोलीस विभागातही ‘सायकल डे’ सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे.





