बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नेरळ पोलिसांची धडक कारवाई !
रायगड (प्रतिनिधी): बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच होणाऱ्या गोहत्यांवर रोख लावण्यासाठी नेरळ पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करत नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे दामत येथील तब्बल २१ कसाईंना तडीपार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई नेरळ पोलिसांच्या इतिहासातील सर्वात मोठी तडीपार कारवाई मानली जात असून, परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तींवर यापूर्वी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून, सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सामाजिक शांतता भंग होऊ नये या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी राहुल वरोटे व कर्जत प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या माध्यामातून ही मोहीम राबविण्यात आली असून, संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व सलोखा राखावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, एकाच वेळी २१ जणांवर करण्यात आलेल्या तडीपार कारवाईमुळे अवैध कत्तल, बेकायदेशीर वाहतूक व कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थानिक नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत करण्यात येत असून, भविष्यातही अशाच कठोर उपाययोजना सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
**********
नेरळ पोलीसांनी केलेल्या कार्यवाहीमुळे गोरक्षकांमध्ये आनंदाचे वातावर आहे. नेरळ पोलीस ठाणे व प्रांताधिकारी कर्जत यांच्या मध्यमातून करण्यात आलेल्या कार्यवाही बदल आमच्या सर्व गोरक्षक व गोप्रेमी यांच्या वत्तीने नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राहुल वरोटे व कर्जत प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहे.
प्रज्ञेश खेडकर, शिवव्याख्याते तथा गोरक्षक, नेरळ





