रायगड (प्रतिनिधी): विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीत सुरू असलेला जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मात्र, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्यापही रस्सीखेच कायम असल्याचे चित्र आहे.
महायुतीत जागावाटपासाठी शिवसेना (शिंदे गट) कडून १७ जागांपैकी ११ जागा भाजपला, ४ जागा शिंदेसेनेला आणि २ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे समोर येत आहे.
या जागेसाठी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या मुलाचा दावा कायम ठेवला असून, त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेकडून या जागेवर आपलाच नैसर्गिक हक्क असल्याचा दावा करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिकेत तटकरे यांनी यासंदर्भात सावध भूमिका घेतली आहे. “कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्व निर्णय आता पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. अद्याप मला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) नेते विकास गोगावले यांनी कोकण स्थानिक मतदारसंघात शिवसेनेचेच सर्वाधिक मतदार असल्याचा दावा केला. “खरा दावा आमचाच आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील, तो आम्हाला मान्य असेल,” असे ते म्हणाले.
कोकणातील या जागेकडे महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे लक्ष लागले असून, अंतिम उमेदवारी आणि जागावाटपाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडूनच होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत या राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





