आरोपी शुभम उतेकरने मुंबईतूनच थरारक कट आखल्याची प्राथमिक माहिती
मध्यरात्री फोन करून घराबाहेर बोलवलं, संपवलं मग जंगलात सोडून दिलं
रायगड (प्रतिनिधी): माणगाव तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. एका ३५ वर्षीय विवाहित व्यक्तीने १५ वर्षीय मुलीला संपवल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या २४ तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र त्याने मुलीसोबत असे का केले ? याचा आता खुलासा झाला आहे. अत्यंत थरारक पद्धतीने आखलेल्या या गुन्ह्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुभम उतेकर, वय वर्ष ३५ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मुंबईतील विलेपार्ले परिसरात राहत असून विवाहित आहे. मृत निधी उतेकर देखील आपल्या कुटुंबासह विलेपार्ले येथे राहत होती. उन्हाळी सुट्टीनिमित्त ती आपल्या मूळगावी माणगावमध्ये आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम निधीला आधीपासूनच ओळखत होता. मुलगी गावी जाणार असल्याची माहिती शुभमला होती. त्यानुसार तो गुपचूप तिचा पाठलाग करत गावी पोहोचला. त्याने सोमवारी रात्री निधीच्या वडिलांच्या फोनवर कॉल करून तिला बाहेर बोलावले आणि जंगलात नेत संपवले, त्यानंतर तो पुन्हा मुंबईला पळून आला,असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याने कसलाही पुरावा मागे सोडला नाही. मात्र एका चुकीमुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. प्लॅन अगदी फुलप्रूफ होता, मात्र एका चुकीमुळे त्याचा गेम ओव्हर झाल्याचे बोलले जात आहे. तपासादरम्यान पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या मोबाईलमधील शेवटचे कॉल्स तपासले. या तांत्रिक तपासातून संशयाची सुई थेट शुभम उतेकरकडे वळली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत विलेपार्ले येथून त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे रायगडसह मुंबई परिसरात मोठी खळबळ उडाली असून, महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास माणगाव पोलीस करत आहेत.





