अलिबाग(प्रतिनिधी): जागतिक सायकल दिनानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग, जिल्हा क्रीडा परिषद रायगड तसेच मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली-अलिबाग येथून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला. निरोगी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि नियमित व्यायामाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी नंदकुमार गोंधळी, कुलाबा प्रबोधिनीचे प्रशिक्षक यतीराज पाटील, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे प्रतिनिधी सुरेंद्र पाटील, स्पर्धा विश्व अकॅडमीचे प्रतिनिधी राज म्हात्रे, शिवानी मेहता यांच्यासह मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले होते.
रॅलीदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी सायकलिंगचे आरोग्यदायी फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवत फिटनेससाठी दररोज सायकल चालविण्याचा संदेश दिला. तसेच पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब करून प्रदूषणमुक्त समाज घडविण्याचे आवाहनही करण्यात आले.
सायकल रॅलीमुळे युवकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून, अशा उपक्रमांमुळे नियमित व्यायाम आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा प्रसार होण्यास निश्चितच मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






