अलिबाग मतदारसंघात विशेष पुनरिक्षण मोहीम; ७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी


अलिबाग (प्रतिनिधी): निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी ३० जून ते ७ ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली. अलिबाग विधानसभा मतदारसंघात २२ जूनअखेर ३ लाख ९ हजार ५८० मतदार असून, त्यापैकी २ लाख ३८ हजार ७४१ मतदारांचे बीएलओमार्फत मॅपिंग पूर्ण झाले आहे. अद्याप ७० हजार ८३९ मतदारांचे मॅपिंग बाकी आहे.
३० जून ते २९ जुलैदरम्यान बीएलओ घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती संकलित करतील. मॅपिंग न झालेल्या मतदारांकडून आयोगाने निर्धारित केलेल्या कागदपत्रांपैकी तीन पुरावे घेतले जाणार आहेत. सध्या मतदारसंघात ३७५ मतदान केंद्रे असून, १,२०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या ३९ केंद्रांचे विभाजन करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या ४१४ पर्यंत वाढणार आहे. ५ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, तर ४ सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती स्वीकारून ७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.