रामदास कदमांनी आधी आपली राजकीय पार्श्वभूमी तपासावी; त्यांच्या वक्तव्याला कायदेशीर नोटिशीने उत्तर देणार – खासदार सुनील तटकरे


“रायगडच्या जनतेने मला सलग ४० वर्षे राजकारणात साथ दिली; माझ्या राजकीय निष्ठेवर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार रामदास कदमांना नाही”

रायगड (प्रतिनिधी): शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम यांनी कोणावरही आरोप करण्यापूर्वी स्वतःची राजकीय पार्श्वभूमी तपासावी. त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आपण त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असून, त्यांनी आपल्या विधानांवर ठाम राहावे, असा इशाराही खासदार तटकरे यांनी दिला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, दादांच्या मृत्यू मागील नेमके कारण काय आहे, याचा शोध भारत सरकारने लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी आपण वारंवार पत्रकार परिषदांमधून केली आहे. या प्रकरणामागील सत्य राज्यातील जनतेसमोर लवकरात लवकर आले पाहिजे, अशी आपली भूमिका आहे.

मात्र, अत्यंत विकृत मानसिकतेतून माझ्यावर आणि दादांसोबतच्या माझ्या संबंधांवर आरोप केले जात असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना माझ्याकडून कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. त्यांनी केलेल्या आरोपांवर ठाम राहावे. त्यानंतर कायद्याच्या चौकटीत योग्य ती पावले उचलली जातील, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

आपण योग्य वेळी जे काही बोलायचे आहे ते निश्चितपणे बोलू. मात्र, जनतेच्या न्यायालयाचा कौल स्वीकारणे काही लोकांना मान्य नाही, अशी टीकाही त्यांनी केली. गेल्या ४० वर्षांपासून रायगडच्या जनतेने आपल्याला सातत्याने साथ दिली आहे. रायगडमधील जनता राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक असून, तिने आपल्या कामावर आणि भूमिकेवर विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे आपल्या राजकीय निष्ठेबाबत रामदास कदम यांनी प्रश्न उपस्थित करू नयेत, असे ते म्हणाले.

स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत रामदास कदम यांनी पूर्वी केलेल्या वक्तव्याचाही तटकरे यांनी यावेळी उल्लेख केला. त्या वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. त्या वेळी त्यांनी नेमकी काय भूमिका घेतली होती, हे जनतेने पाहिले आहे. त्यामुळे आता त्या विषयावर अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी सांगितले.

तुम्ही निवडणुकीत पराभूत झालात, पण राजकारणात कायम राहिलात, याची जाणीव ठेवावी. माझ्या राजकीय प्रवासाबाबत आणि जनतेच्या पाठिंब्याबाबत रामदास कदम यांनी मला शिकवण्याची गरज नाही. आता झाले, बास, पुरे झाले, अशा शब्दांत खासदार सुनील तटकरे यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला.

तटकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे रायगडसह राज्यातील राजकीय वर्तुळात या आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.