२५ वर्षांची परंपरा कायम! मापगाव आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना दिवाळी फराळाचे वाटप


सुचित सुनील थळे यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत दिवाळीचा गोडवा

सुनिल थळे दुखी असल्या कारणाने त्यांच्या अनुपस्थीतीत कार्यक्रम करण्यात आला.

अलिबाग (प्रतिनिधी) : दिवाळी हा सण आनंद, उत्साह, प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. समाजातील प्रत्येक घटकाची दिवाळी आनंदात आणि गोड व्हावी, या उदात्त भावनेतून मापगाव आदिवासी वाडी येथे गेल्या २५ वर्षांपासून दिवाळी फराळ वाटपाची परंपरा जपली जात आहे. यंदाही ही परंपरा कायम राखत मापगाव आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

सुनील थळे व थळे परिवाराच्या वतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदा सुनील थळे यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव सुचित सुनील थळे यांनी पुढाकार घेत आपल्या परिवाराची ही २५ वर्षांची सामाजिक परंपरा समर्थपणे पुढे सुरू ठेवली. त्यांच्या माध्यमातून मापगाव आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

केवळ सणासुदीला मदतीचा हात देणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे सणाचा आनंद घ्यावा, आपुलकीचे आणि माणुसकीचे नाते अधिक दृढ व्हावे, ही या उपक्रमामागील भावना आहे. सातत्याने २५ वर्षे हा उपक्रम राबवून थळे परिवाराने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. सुचित थळे यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवल्याने उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.

या फराळ वाटप कार्यक्रमाला गुरुवर्य चांदोरकर सर, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय शिंदे, चंद्रकांत खोत, माजी सरपंच शैला नाईक, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, सामाजिक कार्यकर्ते विवेक जोशी, राजेंद्र घरत, निशांत घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

२५ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा म्हणजे सामाजिक जिव्हाळा, माणुसकी आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम आहे. सुचित सुनील थळे यांनी पुढाकार घेत ही परंपरा कायम ठेवल्याने मापगाव आदिवासी वाडीतील ग्रामस्थांची दिवाळी अधिक गोड झाली.