माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते श्रीबाग-म्हाडा आयलंडचे लोकार्पण; संदीप पालकर व श्वेता पालकर यांच्या प्रयत्नांना यश
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग शहरातील श्रीबाग-म्हाडा कॉलनी परिसराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. श्रीबाग-म्हाडा आयलंडचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या विकासकामामुळे परिसराचा कायापालट झाला असून, श्रीबाग-म्हाडा परिसर अधिक आकर्षक आणि सुशोभित झाला आहे.
या प्रभागातील नगरसेवक तथा अलिबाग नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते ॲड. संदीप पालकर आणि नगरसेविका श्वेता पालकर यांच्या विशेष प्रयत्नांतून हे सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास आले. परिसराचा विकास आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे श्रीबाग-म्हाडा कॉलनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील आयलंडला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे.
या सुशोभीकरणामुळे परिसराच्या सौंदर्यात लक्षणीय वाढ झाली असून, नागरिकांनी या विकासकामाचे स्वागत केले आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या माध्यमातून परिसराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचे या कामातून दिसून येत आहे.
या लोकार्पण सोहळ्याला अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, पाणी सभापती अनिल चोपडा, स्वीकृत नगरसेवक प्रदीप नाईक, ज्येष्ठ नागरिक मंजुरे मॅडम, सुरेखा भोसले, लक्ष्मीदेवी वर्मा, शमा बंद्री, साठे सर, सुतार सर, वसंत जैन, जितेंद्र जैन, वैभव नाईक, सीताराम काजवे, मानसी पालकर, दिशा काजवे यांच्यासह श्रीबाग-म्हाडा कॉलनीतील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकासकामामुळे श्रीबाग-म्हाडा परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.









