म्हसळा (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना अधिक सुलभ व सुटसुटीत पद्धतीने राबविण्यासह योजनेच्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीमध्ये सहअध्यक्ष नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १९३-श्रीवर्धन विधानसभा क्षेत्राच्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी मु. गडदाव, पो. संदेरी, ता. म्हसळा येथील श्री. महेश पांडुरंग शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेश राज्य शासनामार्फत दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ना. कु. आदिती वरदा सुनील तटकरे या सदर समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत.
श्री. महेश शिर्के यांच्या नियुक्तीमुळे श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रातील शेत/पाणंद रस्त्यांच्या विकासाला अधिक गती मिळण्यासोबतच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक स्तरावर अधिक सक्षम यंत्रणा निर्माण होणार आहे. शेतकरी बांधवांच्या दळणवळणाच्या समस्या सोडविणे, ग्रामीण भागातील शेतीसाठी रस्ते सुविधा विकसित करणे आणि शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
म्हसळा तालुक्यातील मु. गडदाव पो. संदेरी येथील महेश शिर्के यांची विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









