अलिबाग (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरसोली येथील बापदेव आळी परिसरात गेल्या आठवडाभरापासून धुमाकूळ घालून नागरिकांसह पशुपालकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या पिसाळलेल्या वानराला अखेर पकडण्यात यश आले आहे. वन्यजीव योद्धा संघटना, रायगड जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक आणि पुण्यातील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली. वानराला पकडण्यात यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरसोली येथील बापदेव आळी परिसरात गेल्या आठवड्यापासून या वानराचा वावर होता. दिवसा झाडांवर लपून बसणारे हे वानर संधी मिळताच थेट गुरांच्या गोठ्यात शिरून बांधलेल्या जनावरांवर हल्ला करत होते. जनावरांच्या तोंडावर, नाकाजवळ तसेच शरीराच्या इतर भागांवर मोठमोठे चावे घेतल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या वानराच्या हल्ल्यात प्रशांत दत्तात्रेय वर्तक यांच्या म्हशीचे अवघ्या आठ दिवसांचे वासरू मृत्युमुखी पडले होते. त्यानंतरही वानराचा उपद्रव सुरूच होता. रविवारी सकाळी सुमारे ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास गुरे गोठ्यातून बाहेर सोडण्याच्या वेळी वानराने पुन्हा हल्ला केला. यावेळी राजेंद्र कवळे यांच्या गोठ्यातील म्हैस आणि वासरासह अन्य म्हशींनाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात जनावरे गंभीर जखमी झाली होती.
सततच्या हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिक आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या घटनेची दखल घेत वन्यजीव बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. रायगड जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसेच वाइल्डलाइफ वॉरियर्स ऑफ अलिबागचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रसाद दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये माजी सरपंच मिलिंद कवळे, माजी उपसरपंच हर्षल नाईक, अदिती सागर, समीर पालकर आणि अक्षय पाटील या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. तसेच पुण्यातील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या तज्ज्ञ पथकानेही बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अखेर संयुक्त पथकाच्या प्रयत्नांना यश आले आणि धुमाकूळ घालणाऱ्या वानराला सुरक्षितपणे पकडण्यात आले. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून दहशतीखाली असलेल्या बापदेव आळी परिसरातील नागरिकांनी आणि पशुपालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, पकडलेल्या वानराची वैद्यकीय तपासणी करून वनविभागाच्या नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.









