नागाव-खारगल्ली येथे भीषण अपघात; रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग-रेवदंडा मार्गावरील एमएसआयडीसीच्या नियोजनशून्य रस्त्याच्या कामाचा आणखी एका नागरिकाला बळी गेला. नागाव-खारगल्ली येथे गुरुवारी (दि. १९) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात बोरपाडा येथील ४८ वर्षीय प्रकाश भगत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्याच्या कामासाठी ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने ते सुमारे १५ ते २० फूट खोल खाली कोसळले.
प्रकाश भगत हे एमएच ०६ बीए २३९४ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून घरी जात असताना हा अपघात घडला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर सुमारे २० मिनिटे मदत मिळाली नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
अलिबाग-रेवदंडा मार्गावर एमएसआयडीसीमार्फत काँक्रिटीकरण व रुंदीकरणाची कामे सुरू असून, अनेक ठिकाणी सूचना फलक, बॅरिकेड्स आणि रात्री दिसणाऱ्या दिव्यांचा अभाव असल्याने अपघात घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात संतप्त नागरिकांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे आणि शेकाप अलिबाग चिटणीस सुरेश घरत यांनी कामातील निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.









