आमदार महेंद्र दळवींना सहकार्याची खुली ऑफर; ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी स्थानिक ग्रामपंचायतीला पुढाकार घेण्याचे आवाहन
अलिबाग (प्रतिनिधी) : श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले; आता नागावसह रायगडमधील अन्य समुद्रकिनाऱ्यांनाही आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहोत, अशी ग्वाही देत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राजकीय विरोधापेक्षा जिल्ह्याचा विकास आणि स्थानिक नागरिकांचा आर्थिक उत्कर्ष अधिक महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले. टीका होत असली तरी विकासाच्या कामात हात आखडता घेणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेश देत आदिती तटकरे यांनी आपल्या राजकीय प्रगल्भतेची चुणूक दाखवून दिल्याचे अलिबाग येथील पत्रकार परिषदेत दिसून आले.
अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्रकिनाऱ्यालाही ब्ल्यू फ्लॅग मानांकन का मिळू शकले नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मंत्री तटकरे म्हणाल्या त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाने आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे होते, असे सूचक विधान तटकरे यांनी केले. नागाव समुद्रकिनाऱ्याला हे मानांकन मिळवून देण्यासाठी आपण मंत्री म्हणून स्वतः संबंधित माहिती घेणार असल्याचे सांगतानाच, स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींना यासाठी काम करण्याची इच्छा असेल, तर मंत्री म्हणून आवश्यक ते सहकार्य आणि मदत निश्चितपणे करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विशेष म्हणजे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून तटकरे कुटुंबीयांवर सातत्याने राजकीय टीका केली जात असतानाही आदिती तटकरे यांनी नागावच्या विकासासाठी सहकार्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आमदार महेंद्र दळवी यांनी पुढाकार घेतल्यास त्यांच्या राजकीय भूमिकेचा विचार न करता नागावच्या पर्यटन विकासासाठी मदतीचा हात पुढे करण्याचे धोरण तटकरे यांनी स्वीकारल्याचे स्पष्ट होते. राजकीय संघर्ष सुरू असला तरी विकासाच्या संधींच्या बाबतीत सहकार्याचे दरवाजे खुले असल्याचा संदेश त्यांच्या भूमिकेतून मिळत आहे.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर आणि गुहागर समुद्रकिनाऱ्यांना २०२६-२७ च्या हंगामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचे ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाले आहे. यामुळे श्रीवर्धनचे नाव आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर पोहोचले असले, तरी या यशामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्याची ओळख अधिक ठळक झाली आहे. त्यामुळे नागावसह जिल्ह्यातील अन्य समुद्रकिनाऱ्यांनाही अशा प्रकारचे मानांकन मिळाल्यास पर्यटन विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे तटकरे यांनी नमूद केले.
ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळविण्याइतकेच ते टिकवून ठेवणेही महत्त्वाचे आव्हान आहे. यासाठी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, सुरक्षितता, पाण्याची गुणवत्ता आणि पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा दर्जा कायम राखावा लागणार आहे. जगभरातील आणि देशभरातील पर्यटक श्रीवर्धनमध्ये यावेत, यासाठी या सुविधांमध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ब्ल्यू फ्लॅग मानांकनामुळे पर्यटकांची संख्या वाढल्यास हॉटेल व्यावसायिक, स्थानिक दुकानदार, मच्छीमार, खाद्यपदार्थ विक्रेते आणि पर्यटनाशी संबंधित युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. समुद्रकिनाऱ्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य देण्यात येणार असून, सर्व स्टॉल एकसमान स्वरूपात उभारण्याचे नियोजन आहे. पार्किंग, स्वच्छता आणि पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांवरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी एक कोटी ४४ लाख रुपये मंजूर झाले आहेत. उर्वरित निधीसाठी पाठपुरावा सुरू असून, केंद्र शासनाकडूनही अधिक निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील तारांगण आणि पेशवे स्मारकाची कामे अंतिम टप्प्यात असून, मुळगाव, जीवना आणि आरावी परिसरातही पर्यटन सुविधा विकसित करण्याचे नियोजन असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
नागावच्या ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी आदिती तटकरे यांनी स्वतः पुढाकार घेण्याची तयारी दर्शविल्याने आता स्थानिक ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः आमदार महेंद्र दळवी या संधीचा उपयोग करून नागावच्या पर्यटन विकासासाठी पुढाकार घेतात का, याकडे लक्ष लागले आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी सहकार्य करण्याच्या तटकरे यांच्या भूमिकेला स्थानिक पातळीवर कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.









