भरत गोगावले यांनी घेतले सुनील तटकरे यांच्या घरी गौरी-गणपतीचे दर्शन; अदिती तटकरे यांच्या पोस्टचीही चर्चा
अलिबाग (प्रतिनिधी): रायगडच्या राजकारणात गेल्या काही काळापासून तटकरे आणि गोगावले यांच्यातील राजकीय संबंधांकडे विशेष लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट देऊन गौरी-गणपतीचे दर्शन घेतल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने गोगावले यांनी तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी तटकरे कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत करून आदर-सत्कार केला. मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे तसेच तटकरे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे, आदिती तटकरे यांनी गोगावले यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने या भेटीची राजकीय चर्चा आणखी रंगली आहे.
रायगडच्या राजकारणात तटकरे आणि गोगावले हे दोन प्रमुख राजकीय केंद्रबिंदू मानले जातात. यापूर्वी दोन्ही गटांमध्ये राजकीय मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले आहेत. विशेषतः रायगडमधील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून खासदार सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने टीका केली जात असताना पालकमंत्री गोगावले यांनी स्वतः तटकरे यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतल्याने या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेली ही कौटुंबिक आणि धार्मिक भेट असली, तरी सध्याच्या रायगडच्या राजकीय पार्श्वभूमीवर तिच्याकडे पाहिले जात असल्याने ‘दर्शन डिप्लोमसी’ची चर्चा रंगली आहे. या भेटीमुळे भविष्यात रायगडच्या राजकारणात काही नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, या भेटीमागे कोणताही राजकीय संदेश असल्याचे दोन्ही बाजूंकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.









