आमदार महेंद्र दळवींवरील टीकेला राजाभाई केणींचे प्रत्युत्तर


भाजपचे सरचिटणीस अ‍ॅड. महेश मोहितेंना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा!

अलिबाग (प्रतिनिधी): भाजपचे सरचिटणीस अ‍ॅड. महेश मोहिते यांनी आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेनेवर केलेल्या टीकेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या काही तालुक्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मोहिते यांनी केलेली टीका वस्तुस्थितीला धरून नसल्याचे केणी यांनी म्हटले आहे.
आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेनेवर टीका करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोहिते यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली होती, असा आरोपही केणी यांनी केला. भाजपमध्ये ते किती दिवस राहणार, असा सवाल उपस्थित करत लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही त्यांनी केला.
आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेनेला लक्ष्य करण्याचे प्रयत्न करू नका. अलिबागमध्ये राहून शिवसेनेविरोधात टीका-टिप्पणी केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही राजाभाई केणी यांनी दिला आहे.