बारावी निकाल जिल्ह्यातील ९४.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण


मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त

अलिबाग रायगड :विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरची दिशा ठरविणार्‍या बारावी परिक्षेचा निकाल‌ सोमवारी (दि.५) ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९४.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागिल वर्षाच्या तुलनेत ०.१७ टक्क्यांनी परिक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.४९ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.९१ टक्के इतके आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी, मार्च २०२५ मध्ये इयत्ता बारावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल सोम मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. बारावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून २९ हजार ४९३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २९ हजार ४१७ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले.‌ यामधील २७ हजार ८४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार ५६९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.६६ टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल ९९.४८ टक्के तळा तालुक्याचा लागला असून, सर्वात कमी ८४.०९ टक्के निकाल श्रीवर्धन तालुक्याचा लागला आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत ०.१७ टक्क्यांनी बारावी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ९४.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर चालू वर्षात ९४.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
………………………….
शाखानिहाय जिल्ह्याचा निकाल

विज्ञान शाखा : ९८.५६
कला शाखा : ८३.९६
वाणिज्य शाखा : ९५.६६
किमान कौशल्य शाखा : ९०.६७
तंत्र विज्ञान : ८१.३३
…………………………..
जे विद्यार्थी बारावी परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तर ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले नाही, अशा विद्यार्थ्यांनी खचून न जाता जोमाने अभ्यास करावा व पुढील परीक्षेत यश संपादित करावे. बारावी नंतर करिअरच्या दृष्टीने अनेक अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्या दृष्टीने पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी.
: नेहा भोसले
मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.
………………………….